Ad will apear here
Next
साहित्याची मेजवानी - मौज
‘मौज’चा दिवाळी अंक म्हणजे रसिक वाचकांसाठी वैविध्यपूर्ण साहित्याची चवदार मेजवानी असते. ‘मौज’चा २०१७चा दिवाळी अंकही त्याला अपवाद नाही. या अंकात प्रसिद्ध झालेली दिवंगत कवी नलेश पाटील यांची ‘सहन करावा ताप कसा हा...’ ही कविता येथे देत आहोत. तसेच अंकातील अन्य साहित्याची झलक सोबत देत आहोत.
.............
सहन करावा ताप कसा हा...

सहन करावा ताप कसा हा, ऊन जाळते पाण्याला
सुकलेल्या काठास फुटावा कंठ नदीच्या गाण्याला

या वणव्याचे काय करावे, कसा कुणी हा विझवावा 
घुमव घुमव तू मल्हाराचा आभाळा धो धो पावा

अग्निफुलांचे कर निर्माल्य, फुलव फुलव तू थेंबकळ्या 
धारा होऊनि मातीवरल्या कर भेगा तू निळ्या निळ्या 

वैशाखाचा कर आषाढ, रात्रमग्न ही सृष्टी होवो
उष्णधून ही विरून सारी कृष्णधून ती फिरून येवो...

पानांवरची टपटप तडतड, झाड करू दे हिरवी फडफड
हिरव्या हृदयातूनी ऐकू दे हिरव्या गर्द ऋतूची धडधड...

सांज सकाळी, सांज दुपारी, सांज त्रिकाळी होऊ दे
गोकुळाचा रंग नभातुन लयीत खाली वर्षू दे... 

शुभ्र झऱ्याचा अविरत काला डोंगर तुडवित राहू दे
इंद्रधनूचा धूसर धुरळा वारा उडवित वाहू दे...

धारा राधा, राधा धारा, रिम्मा झिम्मा फेर धरू दे
अंधाराच्या कृष्णासंगे सृष्टी रासक्रीडा करू दे

- कै. नलेश पाटील

(‘मौज’चा दिवाळी अंक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)
......................
या वर्षीच्या ‘मौज’मध्ये - 

कला, राजकारण, विज्ञान, ललित, सामाजिक आणि वाङ्‌मयीन विषयकक्षांना स्पर्श करणारं नव्या-जुन्या लेखकांचं सशक्त साहित्य

लेख :
- खासदार विनय सहस्रबुद्धे यांचा लोकशाहीच्या गुणवत्तेचा ऊहापोह करणारा लेख
- माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचा गांधीवादी कार्यकर्ते शंकरराव देव यांचं व्यक्तित्व रेखाटणारा लेख
- अतुल देऊळगावकर यांचा मानवाकडून होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाची वस्तुनिष्ठपणे मीमांसा करणारा लेख

ललित लेख :
- श्रीरंग भागवत यांनी आपल्या एका आफ्रिकन मैत्रिणीचं रेखाटलेलं आगळं व्यक्तिचित्र 
- शिवलिंगाच्या भूगर्भीय निर्मितीवर अश्विन पुंडिलक यांचा अभ्यासपूर्ण लेख
- ‘सुख म्हणजे नक्की काय’ यावर वैज्ञानिक दृष्टीकोनातून प्रकाश टाकणारा बाळ फोंडके यांचा लेख
- ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांनी घेतलेला पाकिस्तानी गझलरचनाकार फैज अहमद फैज यांच्या गझल-निर्मितीच्या अप्रत्यक्ष प्रेरणांचा चरित्रात्मक वेध
- गानतपस्विनी किशोरीताई आमोणकर यांच्या गायनशैलीवर ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांचा आस्वादपर लेख
- संस्कृत अभ्यासक वैशाली दाबके यांचा ‘महाभारत आणि संस्कृत नाट्यसृष्टी’ हा महाभारतकालीन नाटकांची वैशिष्ट्यं टिपणारा वैचारिक लेख
- याशिवाय चंद्रमोहन कुलकर्णी यांनी लिहिलं आहे एका अनाकलनीय त्रिबंधाबद्दल आणि ज्योती मोकाशी-कानिटकर यांनी लिहिलं आहे - एका प्रकल्पाच्या निमित्ताने खेळातून मुलींच्या मानसिक, शारीरिक व्यक्तित्व विकासाबद्दल...

इतर ललित लेखन :
- विनया जंगले यांनी लिहिलं आहे वन्य सर्पजीवनावर, तर रश्मी कशेळकर यांचा लेख आहे मार्जारप्रेमावर..
- ज्येष्ठ नाट्य-चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांनी स्वतःच्या एका चित्रपटामागच्या निर्मितीचा प्रवास उलगडून दाखवला आहे, तर नंदू मुलमुले यांनी एका थरारक इटालियन चित्रपटाचा ‘दृश्यात्मक’ प्रवास कथन केला आहे...

‘सजर्नशील साहित्यातील कथा’ या महत्त्वाच्या विभागात :
- शर्मिला फडके, नचिकेत गद्रे या आश्वासक कथाकारांच्या बरोबरीने सानिया, विलास केळसकर यांच्या दमदार कथा आहेत.
- मौजेचा कविता विभाग याही वर्षी अनेक समकालीन कवींच्या जाणिवा समृद्ध करणाऱ्या कवितांनी सजलेला आहे.
- मुखपृष्ठ सजावट प्रभाकर कोलते यांची आहे आणि आतील सजावट चंद्रमोहन कुलकर्णी आणि विनायक सुतार यांची आहे.

संपादक : मोनिका गजेंद्रगडकर 
पाने : २४०
किंमत : दोनशे रुपये

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZTCBH
Similar Posts
दिवाळीची वाचनसंस्कृती - काळानुरूप बदललेला सण! इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे आव्हान उभे टाकलेले असताना मुद्रित माध्यमे नामशेष होतील अशी भीती अनेक जण व्यक्त करत आहेत. खरोखर तसे दृश्य दिसतही होते; मात्र गेल्या काही दिवसांत चित्र बदलले आहे. आता इलेक्ट्रॉनिक माध्यमेही दिवाळी अंक काढून या माध्यमाकडे वळत आहेत. यावरून दिवाळी अंकाची आणि छापील शब्दांची शक्ती आपण समजू शकतो
...आणि दिवाळी पहाट खुलू लागली दिवाळीची पहाट सांगीतिक कार्यक्रमाने खुलवण्याची पद्धत आज सर्वदूर रूढ झाली आहे. ९०च्या दशकात ही संकल्पना पहिल्यांदा रुजली, ती राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात. उत्साही आणि रसिक पुणेकरांनी या संकल्पनेला उदंड प्रतिसाद दिला आणि मग विविध संस्थांमार्फत ‘दिवाळी पहाट’चे आयोजन केले जाऊ लागले. राज्याच्या अनेक भागांतही ती पोहोचली
आठ वर्षांच्या ओवीचं कीर्तन दिवाळी पहाट विशेष कीर्तन कीर्तनकार : ओवी अमोल काळे, पुणे (वय वर्षे आठ - २०१७मध्ये) हार्मोनियम : स्वामिनी कुलकर्णी गायन : मोहिनी कुलकर्णी, अमोल अशोक काळे व्हिडिओ : देवेंद्र परांजपे, कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्स प्रस्तुती : BytesOfIndia.com
दिवाळी अंकांची वैभवशाली परंपरा मराठीतल्या दिवाळी अंकांच्या परंपरेला यंदा १०८ वर्षे पूर्ण होत आहेत. आज दिवाळीचा सण दिवाळी अंकांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. संस्कृतीत इतके अढळ स्थान लाभलेल्या या दिवाळी अंकांच्या वैभवशाली परंपरेचा आढावा घेणारा ज्येष्ठ पत्रकार विवेक सबनीस यांचा हा लेख...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language